अकोलेमधील निळवंडे येथील धरणाच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहे. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकरी व स्थानिक नागरिकांनी सोमवारी रात्रीपासून धामणगाव रोडवरील घोलप नजिक असणाऱ्या धरणाच्या कालव्यामध्ये बसून शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग, भजनाच्या साथीने आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
निळवंडे धरणाच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी उशीरा निळवंडेच्या उजव्या कालव्यात आंदोलकांनी तंबू ठोकून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पाण्याचे योग्य वाटप, कालव्यांमध्ये वेळेवर पाणी सोडणे तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी आता या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अभी नहीं तो कभी नही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आंदोलनादरम्यान पाणी आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं, आमचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, असा ठाम इशारा संघर्ष समितीने दिला. तसेच पालकमंत्र्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही करण्यात आली. यापूर्वी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
धरण व बंधारे आमच्या तालुक्यात, शेती आमची; पण पाणी आमच्या डोळ्यासमोरून वाहून जाते आणि आम्हाला मिळत नाही. अजून किती बळी गेल्यावर आम्हाला न्याय मिळणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
आम्हाला हक्काचे पाणी द्या अशी मागणी करत या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास आंदोलनकर्ते शेतकरी कालवा उद्ध्वस्त करतील. या पलीकडे जाऊन खाली पाणी जाऊन देणार नाही, यासाठी प्रसंगी धरणाचे चाक देखील बंद करण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
आंदोलनात कम्युनिस्ट नेते डॉ. अजित नवले, शिवसेना शिंदे गटाचे नेते बाळासाहेब भोर, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानूदास तिकांडे, अगस्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष गणेश पापळ, अण्णा शेटे, माजी उपसरपंच अशोक देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी कालव्यामध्ये उपोषणास बसले आहेत. या ठिकाणी भजन व गायन करत शेतकरी भर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी टाहो फोडत आहे.
प्रवरानगर : निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून निश्चित केले आहे. लाभक्षेत्रातील पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांनाही याचा लाभमिळावा, ही मागणी मंत्री विखे पाटील यांनी मान्य केली आहे. यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अकोलेतील शेतकऱ्यांनी नुकतीच मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.






