लक्ष्मण हाके यांची पुणे येथे पत्रकार परिषद (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगितले. सातारा मधून निनावी फोन येत असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.
हाके यांनी सांगितले की, त्यांच्या गाडीला कट मारणे, गाडी अडवणे असे प्रकार घडत असून ते कुठेही थांबले की विशिष्ट समाजाचे लोक गोळा होतात. राज्य मागास वर्ग आयोग सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांना जातीयवादी ठरवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रातून शेकडो धमक्यांचे कॉल, जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. बीड प्रकरणात मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नाही. या प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी आरोपींची आडनावे शोधून एका समाजाला आरोपी ठरण्याचा प्रयत्न केला, तो समाज माझ्या ओबीसी प्रवर्गांतर्गत येतो, असे हाके म्हणाले. आरोपींच्या आडनावावरून एका समाजाला लक्ष्य केले गेले. ओबीसी प्रवर्गातील एका समाजाला, त्या समाजातील अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जात असेल, त्यावेळी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी उभा राहिलो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी हाके यांनी केली.
लातूरमधील एका प्रेम प्रकरणातील हत्येचा मुद्दा उपस्थित करत हाके यांनी सांगितले की, पिस्तुलधारी आरोपींचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबतचे फोटो त्यांच्याकडे असूनही त्यावर कोणीही बोलत नाही. शिक्षकांची बिंदू नामावली काढून जातीय तेढ निर्माण केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मिक कराड चालतात- लक्ष्मण हाके
सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून स्वत:च्या फायद्याचं राजकारण करू पाहत आहेत. ते एका समाजाविरोधात गरळ ओकण्याचं काम करत आहेत. मोर्चे काढत असून जाणीवपूर्व धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेवेळी बोलत होते.
हेही वाचा: Laxman Hake : निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मिक कराड चालतात अन् आता…; लक्ष्मण हाके सत्ताधाऱ्यांवर कडाडले
संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करत नाही. पण आम्हाला मंत्री होता येत नाही, खासदार-आमदार होता येत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी माणसं तिकडे हवी आहेत. तुम्ही त्यांनाच गुन्हेगार ठरवत आहात. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात असलं जात आहे. वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध होते. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत.