रेवदंडा तलाठी कार्यलयात चाललंय तरी काय ! सातबारा उताऱ्यावर वारस नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना अधिकाऱ्यांना पकडले
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे एका जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंदवण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चौल मंडळ अधिकारी व महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दिनांक 7 मे 2025 रोजी पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेची जमीन मौजे आगरकोट, रेवदंडा, तालुका अलिबाग येथे असून त्या जमिनीचे सातबारा उताऱ्यावर वारस नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी तक्रारदार दिनांक 5 मे 2025 रोजी चौल मंडळ अधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर आणि तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी दोघांनीही सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये, असे एकूण 10,000 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने 6 मे रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
Devendra Fadnavis: “आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तक्रारीच्या अनुषंगाने विभागाच्या पथकाने 6 मे रोजी पडताळणी केली असता, मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार 7 मे रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी तक्रारदाराकडून मागणी केलेली पाच हजार रुपयांची लाच पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वीकारली. लाच स्वीकारल्यानंतर त्या कार्यालयातून निघण्याच्या तयारीत असताना तक्रारदाराच्या इशाऱ्यावरून त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.
दुसरीकडे, मंडळ अधिकारी विजय मापुसकर यांनी स्वतःसाठी मागितलेली पाच हजार रुपयांची लाच नंतर आणण्याचा संकेत दिला होता. त्यांनीही लाचेची मागणी केल्यामुळे त्यांनाही पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, सुषमा राऊळ आणि सागर पाटील यांच्या पथकाने केली.
चित्रकार रामदास लोभी यांच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन, केव्हा आणि कुठे असणार ‘हे’ प्रदर्शन
महत्वाचे आवाहन: रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणताही एजंट शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काशिवाय अतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, कृपया तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड-अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधावा.