सोजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती/ अमोल तोरणे : राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती बारामती मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघातून चार ते पाच जणांनी उमेदवारीची मागणी केली. तर बारामती विधानसभेसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
राष्ट्रीय समाज पक्ष तालुका बारामती व तालुका इंदापुर दोन विधानसभा मतदार संघ उमेदवारीसाठी आढावा बारामती येथे पार पडली, या बैठकीत बुथ कमिटी व विधानसभा उमेदवारी संदर्भात चर्चा झाली. इंदापुर तालक्यामधून ४ ते ५ जणांनी उमेदवारीची मागणी केली. बारामतीमधून एकमतांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदिप चोपडे यांची सर्व कार्यकर्त्यांनी मागणी उचलून धरली, या मागणीला वरिष्ठांनी दुजोरा दिला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार तळागाळा पर्यंत पोचवण्यात येणार आहेत, गाव तेथे शाखा ही मोहिम राबविणार आहे, तसेच घराणेशाहीला छेद देत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक गावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा काढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्यासह युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संदिप चोपडे, दुसरे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, विनायक रूपनवर, संजय माने, जिल्हा नियोजन सदस्य तानाजी शिंगाडे, इंदापुर तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, नवनाथ कोळेकर व बारामती तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, घनश्याम देवकाते, दशरथ आटोळे, काका बुरूंगले, महादेव कोकरे आदींसह पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.