राजगुरूनगर : छत्रपती शिव शंभू सोशल फाऊंडेशन दावडीच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत ओंकार तिकांडे याने प्रथम क्रमांक पटकावला. सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या वतीने रोख पारितोषिक व छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
मुलांना आपला इतिहास व त्याचे साक्षीदार असलेल्या गडकोटांची माहिती व्हावी त्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्यांचे स्वराज्य निर्मितीसाठी असणारे योगदान आणि एकूणच या सर्व काळाचा मुलांकडून अभ्यास व्हावा, तसेच यादृष्टीने त्यांच्याबद्दलची आवड वृद्धिंगत व्हावी या दृष्टीनेच छत्रपती शिव शंभू सोशल फाउंडेशन तर्फे दावडीत प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला. सहभागी मुलांना प्रोत्साहन बक्षिसे देऊन त्यांच्या बनवलेल्या गडकिल्ले प्रतिकृतीचे कौतुकही करण्यात आले.
या उपक्रमात सुमारे ३२ मुला मुलींनी सहभाग नोंदवला तर मुलांनी वेगवेगळ्या गडकोटांच्या आकर्षक प्रतिकृती उभारल्या होत्या. श्रीमंत महाराजा फत्तेसिहं राव गायकवाड विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी या कार्यक्रमात सहभागी झाले. स्पर्धेत ओंकार संतोष तिकांडे याने प्रथम, तर मनस्वी गणेश शिंदे, नवरत्न मित्र मंडळ दावडी आणि श्रीवेद सुरेश डुंबरे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावला.
या मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप
स्कुल समिटीचे सदस्य माजी सरपंच सुरेश डुंबरे पाटील, स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे, प्राचार्य अंकुश केंगारे, पर्यवेक्षक राऊत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन गणेश म्हसाडे व आशुतोष शितोळे यांनी केले.