संग्रहित फोटो
शिरवळ/ जीवन सोनवणे : खंडाळा तालुक्यात शिरवळ आणि परिसरात सध्या ऑनलाईन मटका खेळाचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा खेळ तरुणाईला आर्थिक अडचणीत टाकत असताना, मटका व्यावसायिक मात्र प्रचंड नफा मिळवत आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या सहज उपलब्धतेमुळे तरुण पिढी या व्यसनात अडकत आहे, ज्याचा फटका त्यांच्या कुटुंबांनाही बसत आहे.
सुरुवातीला केवळ मजेसाठी खेळले जाणारे हे जुगाराचे खेळ आता काही जणांसाठी सवयीचे झाले आहे. छोट्या रकमेसाठी सुरू होणाऱ्या या खेळात तरुण मोठ्या प्रमाणावर पैसे गमावत आहेत. कर्जबाजारीपण, आर्थिक ताणतणाव, कौटुंबिक कलह आणि शैक्षणिक नुकसान हे या व्यसनाचे प्रमुख परिणाम दिसून येत आहेत. खंडाळा तालुक्यातील काही गावांमध्ये या व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. अनेक तरुण शिक्षण आणि नोकरीकडे दुर्लक्ष करून आपला वेळ आणि पैसा मटकामध्ये घालवत आहेत. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांना कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागत आहे. मटका व्यावसायिक मात्र या परिस्थितीचा फायदा घेत मोठी कमाई करत आहेत. त्यांचे नेटवर्क ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्सद्वारे देशभर पसरले आहे. कमी गुंतवणुकीत भरपूर नफा मिळणाऱ्या या व्यवसायामुळे ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहेत.
तरुणाई भिकेला लागली
मटका हा सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी खेळला जातो, परंतु हळूहळू तो व्यसनाचे रूप धारण करतो. कर्ज काढून पैसे लावणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर होत आहे. रोजगाराऐवजी जुगारावर अवलंबून असलेल्या तरुणांना वारंवार नुकसान सहन करावे लागत आहे, परिणामी ते नैराश्यात ढकलले जात आहेत. अशा प्रकारांमुळे काही तरुणांनी आत्महत्येचा मार्ग देखील स्वीकारला आहे.
व्यावसायिकांची चांदी
मटकामध्ये गुंतवणूक करणारे व्यावसायिक आणि दलाल मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहेत. बेकायदेशीर व्यवहारातून लाखो रुपये वसूल केले जात आहेत. हे पैसे काळ्या बाजारात गुंतवले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. तांत्रिक साधनांचा वापर करून हे लोक आपल्या व्यवसायाला चालना देत आहेत आणि सामान्य जनतेच्या संकटाचा फायदा घेत आहेत.
पोलिसांचे दुर्लक्ष
मटक्याच्या या वाढत्या समस्येवर पोलिसांचे लक्ष अत्यंत नगण्य आहे. तक्रारी असूनही पोलिसांनी कारवाई टाळल्यामुळे मटका व्यवसायिकांचे धाडस अधिकच वाढले आहे. काही ठिकाणी पोलिसांवरच मटकाबाजांशी हातमिळवणी केल्याचे आरोप आहेत. यामुळे गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही.
समाजाच्या जबाबदारीची गरज
या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनासोबतच समाजाने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. युवकांमध्ये जनजागृती करून त्यांना या व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शासनाने कठोर उपाययोजना करून ऑनलाईन मटकावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, तरुणाईचे भवितव्य उद्ध्वस्त होऊन सामाजिक व्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.