बारामती : खासदार सुप्रिया सुळे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास १५ दिवस उलटून गेल्यानंतर आज (२० जून) शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयावर भाष्य करत थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला आहे. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या. पंतप्रधान दीड लाख मतांनी विजयी झाले. तर सुप्रिया सुळेंना एक लाख ५४ हजार मते पडली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नुकत्याच झालेल्य लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढाई ही सर्वात प्रतिष्ठेची लढाई ठरली. बारमतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी अशी लढत झाली. यांत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मते टाकली.
शरद पवार म्हणाले, 1967 साली मी नुकताच कॉलेज जीवनातून बाहेर आलो होतो. सोमेश्वर कारखान्याचे बाबूलाल काकडे यांच्या विरोधात निवडणूक लढलो आणि बारामतीकरांनी मला विजयी केले. बारामतीमधील तरुण पिढीने मला नेहमीच साथ दिली. सुप्रिया सुळे यांची २०२४ ची ही निवडणूक चौथी निवडणूक असतानाही त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले. बारामतीत्. जनतेला कोणते बटन दाबायचे हे सांगावे लागत नाही.
भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर आता लोकांना विश्वास राहिला नाही, असेच चित्र महाराष्ट्रात आणि देशात दिसत आहे. हेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले. पंतप्रधान मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची महाराष्ट्रात भाजप मागे पडला. इतकेच नव्हे तर, भाजपला केंद्रातही स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. पण तरीही एनडीएचे सरकार स्थापन केले आहे. निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपवर टिका केली.
जनतेचा आता मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर विश्वास उरला नाही. मोदींनी जी आश्वासने दिली होती ती गेल्या 5-10 वर्षांत कधीही पाळली नाही, आता हे लोकांच्या लक्षात आले आहे. पण आता लोकांना बदल हवा आहे, त्यामुळे राज्यात हे चित्र बदलल्याचे शरद पवार यांनी यावेळी नमुद केले.