मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश
वाई : पश्चिम भागातील मालतपूर (ता. वाई) येथे डंपरच्या भीषण धडकेत अभिजीत दत्तात्रय वाडकर या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पश्चिम भागात तीव्र संताप उसळला. कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गमावल्याने वाडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन लहान मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मालतपूर–वाई रस्त्यावर आक्रमक ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनियंत्रित डंपर वाहतूक, बेकायदेशीर माती उपसा आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळेच ही दुर्घटना घडल्याचा ग्रामस्थांचा ठाम आरोप आहे.
“माती माफिया”वर ग्रामस्थांचा आक्रोश बेकायदेशीर माती उपसा व सुसाट धावणाऱ्या डंपर वाहतुकीमुळे संपूर्ण परिसर धोकादायक बनल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अपघातांची मालिका अनेक दिवसांपासून सुरूच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या दोन महिन्यांमध्ये पाच ते सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह पश्चिम भागातील अरुंद रस्ते, अपुऱ्या सुरक्षा सुविधा, रिफ्लेक्टरचा अभाव, दिशादर्शक फलकांची कमतरता तसेच पुलांवरील संरक्षक कठड्यांची अनुपस्थिती यामुळे रस्ते मृत्यूचा सापळा बनले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वारंवार अपघात होत असल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. डंपर चालक व बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी घेतला. “दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
मालतपूर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती
मालतपूर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आंदोलनामुळे मालतपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
तहसीलदारांच्या उपस्थितीची मागणी; आंदोलन तीव्र होण्याचा इशारा
“आता सहनशीलतेची सीमा संपली आहे. ठोस निर्णय आणि कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
या संवेदनशील प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राजकारण्यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळवून द्यावी
वाई तालुक्याचा पश्चिम भाग भक्ती शक्तीचा सांप्रदायाचा टाळकऱ्यांचा धारकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा मानला जातो. धोम आणि बलकवडी धरणाच्या निर्मितीसाठी आपल्या भागाचा गावाचा शेतीचा त्याग करणाऱ्या पश्चिम भागातील लोकांना रस्त्यावर उतरावं लागणं खूप क्लेशदायक आहे. या प्रकरणांमध्ये राजकीय पुढार्यांनी राजकारण न करता अपघातग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याकरता पुढाकार घ्यावा, अशी मागणी मालतपूर ग्रामस्थांनी केली आहे.






