शपथविधीनंतर 2 दिवसांतच मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा राजीनामा
कर्नाटकच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, बुधवारी (३ जून) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि के शिवकुमार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लोक भवन येथील ग्लास हाऊसमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल थवर चंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र आता दोनच दिवसात कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळत असून शपथविधीनंतर दोन दिवसांतच मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. मंत्रिपदाच्या वाटपावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नाराजीचा पहिला फटका बसला असून रामलिंगा रेड्डी यांनी खातेवाटपाबाबत नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.
कर्नाटकात नव्याने बनवण्यात आलेल्या मंत्रिमंडळात मंत्रीपदे आणि खातेवाटपारून काँग्रेसमध्येच अंतर्गत नाराजी असल्याचे स्पष्ट झाले असून एका मोठ्या राजकीय नात्यात याचे रूपांतर झाले आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. रेड्डी यांनी आपली नाराजी जाहीर करत स्पष्ट केले कि त्यांना दिलेला शब्द पाळण्यात आला नाही ज्यामुळे त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. रेड्डी हे कॅबिनेट सोडणार असले तरी काँग्रेस आमदार आणि काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ते पूर्णवेळ काम करणार आहेत. पत्रकार परिषद घेत रामलिंगा रेड्डी यांनी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर निशाणा साधला.
रामलिंगा रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ते यावेळी म्हणाले, “डि के शिवकुमार जेव्हा माझया घरी आले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते कि जेव्हा ते मुख्यमंत्री बनतील तेव्हा ते बेंगळुरू विकास मंत्रालय सोडून देतील आणि मग तुम्ही ते सांभाळा. मी कधीच या खात्याची मागणी स्वतः केली नाही. परंतु, मला याबाबत सारखा विश्वास देण्यात आला. दोन वेळा वचन दिल्यानंतर आता मला जल संसाधन विभाग देण्यात आला. या निर्णयानंतर मी निराश झालो असून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.”
रामलिंगा रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून आता मुख्यमंत्री डि के शिवकुमार यावर काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्रीपद आणि नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षाचा अखेर शेवट झाला आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार माजी मुख्यमंत्री डी. के. सिद्धरामय्या यांनी २८ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नेतृत्वबदलाचा मार्ग मोकळा झाला.
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कर्नाटकात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करत असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, नेतृत्वबदलानंतर पक्षांतर्गत संतुलन राखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC) सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयातून पक्षाने सिद्धरामय्या यांना सन्मानजनक भूमिका देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.






