मोठे शिक्षणसम्राट हरपले! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात मोठी मजल मारली. समाजसेवा, शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था आज देश-विदेशात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जातात.
DY पाटील मैदानावर होणार कोल्ड प्ले संगीत कार्यक्रम ; सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
राजकीय कारकिर्दीतही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. काही काळ ते काँग्रेसपासून दूर राहिले असले, तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख कायम होती. शांत, संयमी आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद राखणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना मान मिळत होता. डॉ. पाटील यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले. राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्यांचे पालन करत प्रशासनात समन्वय राखण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळाची विविध स्तरांवर प्रशंसा झाली होती.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची सर्वाधिक ओळख म्हणजे नवी मुंबई आणि पुणे येथे उभारलेली डी. वाय. पाटील विद्यापीठे. वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आणि इतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात या संस्थांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा त्यांनी दिलेला वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.
डी वाय पाटील व्यवस्थापकांविरोधात काँग्रेसचा निषेध, पाहा व्हिडिओ






