संग्रहित फोटो
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावात मुंबईकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या (Godan Express) डब्याखालून धूर निघाल्याने आग लागल्याच्या भीतीने प्रवासी घाबरले. यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या.
मुंबईला जाणारी गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्स्प्रेस शनिवारी मुंबईकडे जात असताना मुंढेगावजवळ एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने मोठा धूर निघाला. यावेळी गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. मात्र, डब्याखालून धूर निघत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र, कोणतीही आग लागली नसल्याची खात्री झाल्यावर एक्स्प्रेस इगतपुरीकडे पुन्हा रवाना करण्यात आली.
त्यानंतर ही एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीच्या कोचच्या लायनरची दुरुस्ती करून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांची एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.