वडगाव मावळ भागामध्ये असणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : सतिश गाडे : राज्यामध्ये जोरदार पावसाने आगमन केले आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आले आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये तसेच पुणे, मराठवाडा, कोकण, विदर्भ अशा सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. पवना धरण 100 टक्के भरले असून ५७२० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुसळधार पावसामुळे नद्या काठच्या गावांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.हवामान विभागाने देखील पुणे जिल्हा घाट माथा क्षेत्रात पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरण ९९.७० टक्के एवढे भरले आहे. दरम्यान आज (दि.१९) सकाळी ९ वाजता धरणातून क्युसेक्सने ५७२० पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात असून सदर विसर्ग १०००० क्युसेक्सने वाढण्याची शक्यता आहे अशी असल्याची माहिती पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पवना धरण पूर नियंत्रण कक्षाने म्हटले आहे की, पवना धरण सद्यस्थितीमध्ये ९९.७० टक्के भरलेले आहे. तथा घाटमाथा परिसराकरिता हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. मावळात परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना धरण क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. तसेच धरण देखील शंभर टक्के भरले असल्याने धरणाचे सहाही दरवाजे उघडून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पवना नदीची पाणीपातळी वाढली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी बारा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरण क्षेत्रात सकाळपासून 31 मि.मी. पाऊस झाला आहे, तसेच धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने धरणात पाणी सतत येत आहे. त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे सहाही दरवाजे उघडले आहेत. पावसाचा अंदाज लक्षात घेता आणि पाण्याचा येवा लक्षात घेत धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. नागरिकांनी खबरदारी बाळगावी. नदीकाठच्या नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच नदीपात्रापासून दूर राहावे, असे आवाहन व सुचना धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला
पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुठा नदीपत्रात हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीपात्रात 15, 442 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. त्या आधी धरणातून 11 हजार 878 ने विसर्ग केला जात होता. आता हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मुळा-मुठा नदीकाठच्या परिसरांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य पूरस्थितीबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नदीकाठच्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची नोंद झाली.