सातारा वनविभागाची कारवाई (फोटो- टीम नवराष्ट्र)
वणवा लावणाऱ्यांच्या मनात भरली चांगलीच धडकी
वनसंपत्तीचे मोठे नुकसान करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई
प्राथमिक चौकशीत वणवा लावल्याचे झाले स्पष्ट
सातारा: सातारा वनपरिक्षेत्रात वणवा लावून वनसंपत्तीचे मोठे नुकसान करणाऱ्यांवर वनविभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, मौजे कासानी परिसरात वणवा लावणाऱ्या सखाराम कोंडीबा बदापुरे कासानी तालुका सातारा, जि. सातारा) या आरोपीला ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे वणवा लावणाऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे.
दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सातारा वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजे कण्हेर येथील वनकंपार्टमेंट क्र. २६८ मध्ये अज्ञात व्यक्तीकडून जाणीवपूर्वक वणवा लावण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक चौकशीत वणवा लावल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयितांचा शोध घेण्यात आला.
सखोल तपासानंतर सकाराम कोंडीबा बदापुरे राहणार कासानी याने वणवा लावल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गु.र.क्र. ०९/२०२६, दि. २२.०४.२०२६ अन्वये भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१)(ब)(फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास संबंधित आरोपीस एक वर्षांपर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
वनक्षेत्रात वणवा लावणे, अवैध वृक्षतोड करणे, वनसंपत्तीची चोरी करणे तसेच वनजमिनीत अतिक्रमण करणे हे गंभीर गुन्हे असून, अशा प्रकारांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही वनविभागाने दिला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
सदरची धडाकेबाज कारवाई उपवनसंरक्षक वनविभाग सातारा, सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनरक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने तपास करून आरोपीला ताब्यात घेतल्याने वनविभागाच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Satara News : विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा घाव; दोन जण ताब्यात
वनविभागाचा कडक इशारा
वनक्षेत्रात वणवा लावणारे, वनसंपत्तीचे नुकसान करणारे किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची माहिती तात्काळ वनविभागास द्यावी. अन्यथा दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाने दिला असून, या कारवाईमुळे आता वणवा लावणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






