Physical Harassment
सिल्लोड : लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाविरूद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पीडित तरुणी तालुक्यातील अंधारी येथील आहे.
दत्तात्रय विजय शेजुळ (२४, रा. उपळी) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षभरापासून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत उपळी शिवारातील शेतातील वखारीत वेळोवेळी बलात्कार केला. या दरम्यान आरोपीने शरीरसंबंध करतानाचे फोटोही मोबाईलमध्ये काढले. ते फोटो पीडितेच्या व्हॉट्सऍपवर पाठवले. शिवाय इतरांना पाठविण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. पीडितेच्या दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे करत आहे.
दरम्यान, आरोपी अंधारी येथील नातेवाईकाच्या दुकानावर कामावर होता. पीडितेची व त्याची येथून ओळख झाली. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे कळते.






