सातारा : महाराष्ट्र राज्यासमोर बेकारी, ओला दुष्काळ तसेच इतर आर्थिक समस्या असे प्रश्न उभे आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला.
कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन वेध भविष्याचा या अभ्यास शिबिराची त्यांनी माहिती दिली. हे शिबिर येत्या चार व पाच नोव्हेंबरला शिर्डी येथे होणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मंथन वेध भविष्याचा या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते अभ्यासक या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाने सभासद नोंदणी मोहीम राबवली असून ती गतिमान करून ग्रामीण शहरी भागात कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्ता प्रसारण याला गती दिली जाणार आहे.
मंथन शिबिराला पाच हजार कार्यकर्ते जाणार
देशासमोर आणि राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधारी मंडळी करत आहेत, ते चुकीचे आहे. लोकांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. सध्या राज्यासमोरील विविध प्रश्नांचा संदर्भात नेमके काय वास्तव आहे या वास्तवाची मांडणी या मंथन शिबिरात केली जाणार आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून पक्षाचा डिजिटल चेहरा अधिक प्रभावी बनवण्याचे प्रयत्न होणार आहेत. जिल्ह्यातून या शिबिरास ५ हजार कार्यकर्ते जाणार आहेत. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.