पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या (दि.1) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत. या परिसरातील शाळा-आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार की बंद ठेवावी लागणार, याबाबत पोलिस यंत्रणा किंवा जिल्हा प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टी (School Holiday) दिली जाईल, असे म्हटले जात आहे.
पंतप्रधान मोदी टिळक पुरस्कारासह विविध प्रकल्पांच्या उद्घाटन-भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत पंतप्रधान पुण्यात असणार आहेत. मोदी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा विद्यापीठ रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता आदी रस्त्याने जाणार आहे. त्यामुळे सकाळी सहापासून दुपारी तीनपर्यंत आवश्यकतेनुसार रस्ते बंद राहतील, अशाप्रकारचा पोलिसांनी आदेश दिला आहे. मात्र, मंगळवारी शाळा-महाविद्यालयांमध्ये, नोकरीसाठी बाहेर पडायचे की नाही, याबाबत पुणेकरांमध्ये प्रचंड संभ्रम आहे.
दरम्यान, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता परिसरात अनेक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी असंख्य वाहने टिळक रस्ता, शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक बंद असल्याने मोठा खोळंबा होण्याची शक्यता लक्षात घेता शाळांना सुट्टी दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे.