अनधिकृत 'प्लॉटिंग'धारकांचे धाबे दणाणले; आळंदीत पाच एकर 'प्लॉटिंग'वर 'पीएमआरडीए'ची कारवाई (File Photo : PMC Action)
पिंपरी : आळंदी शहराच्या नजीक असलेल्या चर्होली खुर्द (ता.खेड) येथील गट नंबर 73 मधील पाच एकर क्षेत्रावर शेतीचे विकसन करून विकण्यात आलेल्या ‘प्लॉटिंग’वर पुणे महानगर प्रदेश विकसन प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएने धडक कारवाई केली आहे. विकसन परवानगी न घेता ‘प्लॉटिंग’ केल्याने हे ‘प्लॉटिंग’ अनधिकृत असल्याचे सांगत पीएमआरडीएने येथील सिमेंट रस्ते, विजेचे खांब, प्रवेशद्वार, सिमेंट गेट व इतर गोष्टी पोकलेन यंत्राच्या साहाय्याने पाडले. पीएमआरडीएचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी ही कारवाई केली आहे.
पाच एकर क्षेत्रामधील सुमारे साडेचार एकर क्षेत्र हे ‘प्लॉटिंग’धारकांनी खरेदी केले होते. काही दिवसांतच या ठिकाणी बांधकामे होणार होती. असे असताना ही कारवाई झाल्याने ’प्लॉटिंग’धारक संकटात आले आहेत. संबंधित शेतकरी नंदकुमार वडगावकर यांनी सांगितले की, ही जागा माझ्या मालकीची असून, मी ती विकसन करण्यासाठी दिली होती. मात्र, पीएमआरडीएने मला कसल्याही प्रकारची नोटीस न बजावता धडक कारवाई केली. त्याला विरोध केला असता, मला बाजूला सारण्यात आले. सदर ठिकाणी मी सिमेंट रस्ते, विद्युत खांब, प्रवेशद्वार, सिमेंट गेट व इतर खर्च करून जागा विकसित केली होती.
तसेच महाराष्ट्रात सगळीकडेच बिनदिक्कत विनापरवानगी ‘प्लॉटिंग’ चालू असताना केवळ काही आर्थिक फायद्यासाठी माझ्याच ‘प्लॉटिंग’वर कारवाई केली गेली. मला माझी बाजू देखील मांडून दिली गेली नाही. यात माझे सुमारे चार कोटींचे नुकसान झाले आहे. अनेक गरिबांची घराची स्वप्ने यामुळे मातीमोल झाली आहेत. त्यांनी कष्ट करून कमावलेले पैसे आणि घेतलेल्या जागेत देखील त्यांना घर बांधताना अटकाव करण्यात येत आहे. या अन्यायाविरुद्ध मी नक्कीच आवाज उठवणार, असे वडगावकर यांनी व्यक्त केले.