संग्रहित फोटो
पंढरपूर/नवनाथ खिलारे : पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत हाेण्यासाठी ३४५ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी केले आहे.
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व पंढरपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेसाठी १५ पोलिस अधिकारी, २१० पोलिस अमंलदार व १२६ होमगार्ड, एक एसआरपीएफ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध
पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ११२ जणांना तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठवले आहेत. संरक्षणासाठी दिलेल्या शस्त्रांचा गैरवापर होऊ नये, यासाठी शहरातील शस्त्र परवाना धारकांकडून ३६ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. उपविभागात विविध गुन्हे दाखल असलेल्या ९ सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करत कारवाई करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डगळे यांनी सांगितले.
ईव्हीएम मशीनसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था
पोलिस प्रशासनाकडून मतदान केंद्राची रचना, सीसीटीव्ही नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, निवडणूक पूर्व व निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नाकाबंदीत संशयित वाहनांची झाडाझडती घेण्यात येणार असून, फिरत्या पथकांमार्फत देखील गैरकृत्यांवर नजर ठेवून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक घोडके यांनी सांगितले.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी 51 सराईत गुन्हेगार हद्दपार
सातारा नगरपालिका निवडणूक अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर धडाकेबाज कारवाई केली आहे. तब्बल ५१ सराईत गुन्हेगारांना सातारा शहर व तालुका हद्दीतून हद्दपार केले आहे. या निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. १ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. संभाव्य गोंधळ, दबाव तंत्रे किंवा बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.






