जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आज थांबणार(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आता या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा गुरुवारी (दि.५) रोजी संपणार आहे तर ७ फेब्रुवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज प्रचार संपत असल्याने राजकीय पक्ष आणि उमेदवारांची चांगलीच धावपळ वाढताना आहे.
जिल्हा परिषदेच्या ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणासाठी ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेचा जानेवारी महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. तेव्हापासून जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला. खेड्यापाड्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात भाजपने काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव
तसेच दुसरीकडे लोकशाही आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने युती करण्यात आली आहे. महायुती, आघाडी आणि अपक्ष असे शेकडो उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भाग्य अजमावणार आहेत. गेल्या 20 दिवसांपासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावागावात उमेदवार गाठी-भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार होते. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यात शासनाने तीन दिवस शोक जाहीर करून शासकीय दुखवटा पाळला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दोन दिवस मुदतवाढ दिली. त्यामळे 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे.
घरबसल्या शोधता येणार मतदारयादीतील नाव
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. हे अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
मतदान केंद्राचीही मिळू शकणार माहिती
मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. यातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल. याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.






