इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाका येथे पोलिसांनी गोवा बनावटीची तब्बल ५७ लाखांची (Islampur Crime) दारू नाकाबंदी करून पकडली. एक हजार बॉक्समधून ४८ हजार बाटल्या बेकायदेशीररित्या नेताना एका ट्रकसह ७५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मंगळवारी रात्री नऊ वाजता पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर दारू साठा पकडल्याने खळबळ माजली आहे.
याप्रकरणी अवैधरित्या दारू वाहतूक करणारा ट्रक चालक सल्लू उर्फ सलमान नजरुद्दीन मकानदार (वय २८, रा. डफळापुर, तालुका जत) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस विनायक देवळेकर यांनी फिर्याद दिली आहे. इस्लामपूर पोलिसांना मंगळवारी रात्री आठ वाजता गोपनीय खबऱ्यामार्फत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी पोलीस पथक बनवून पेठनाका येथे नाकाबंदी केली. तपासणीदरम्यान हा ट्रक (एमच ५० एन ३९९९) हा संशयास्पदरित्या मिळाला.
पोलीस असल्याचे पाहून ट्रकचा चालक सलमान मकानदार घाबरला होता. त्याला विचारणा केली असताना त्याने ट्रकमध्ये दारूचे बॉक्स असल्याचे सांगितले. हा दारूसाठा कराड येथील जमीर पटेल याला विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात आणून झडती घेतली असता या ट्रकमधून एक हजार बॉक्स मिळून आले. यात १८० मिलीच्या तब्बल ४८ हजार बाटल्या मिळाल्या. ५७ लाख ६०० रुपयांची ही दारू व १८ लाख रुपयांचा ट्रक असा तब्बल ७५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, पोलीस शिपाई विनायक देवळकेर, उदय पाटील, अभिजित पाटील यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.
संबंधित ट्रकचालक एवढा मोठा दारू साठा नेमका कुठे नेणार होता? दारूचा साठा कोणाच्या सांगण्यावरून केला जात होता? याच्या मूळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. याच्या मुख्य सूत्रधाराला लवकर गजाआड करू.
– संजय हारुगडे, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर पोलीस ठाणे.