अमळनेरमध्ये रस्त्यांची वाईट अवस्था असून रेल्वे बांधकाम व सार्वजनिक बांधकाम एकमेकांवर आरोप केले (फोटो - सोशल मीडिया)
Road Condition: अमळनेर : शहराच्या मारवड रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाच्या मध्यभागी पडलेले खड्डे, बोरी नदी पुलांवरील खड्डे आणि धुळे रस्त्याला जोडणाऱ्या डीपी रस्ता व सम्राट हॉटेल जवळील रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत. हे जागोजागी पडलेले खड्डे प्रवाशांच्या पाठीचे मणके मोडत असून दुरुस्तीअभावी हाडांच्या दवाखान्यातील रुग्णांची संख्या वाढली आहे. रेल्वे उड्डाणपुलावरील खड्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी पाठपुरावा केला असता रेल्वे बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकअडे बोट दाखवत धन्यता मानत आहेत. लोकप्रतिनिधींचे ही याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
मारवड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा मध्यभाग हा रेल्वेच्या बांधकाम विभागाने बांधला असून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी रेल्वेच्या बांधकाम विभागावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जाते. मात्र, या विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलाच्च्या पलीकडे प्रताप कॉलेज असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. तसेच धार, मारवड व इतर पंधरा गावांना जाण्यासाठी हीच वाट आहे. मात्र उड्डाणपुलावरून जाणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना खड्ड्यांमधून वाट काढताना त्यांचा जीव मुठीत धरावा लागत आहे. खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत त्यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असून यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
फरशी पुलावर खड्ड्यांमुळे अपघाताची भीती…
त्याच प्रमाणे बांरी नदीच्या पुलावर देखील खड्डे पडले आहेत. हजारो वाहने चोपडा, जळगाव, पारोळा, धरणगावकडे ये जा करीत असतात. वाहनांना झटके बसून प्रवाशांना कमरेला त्रास होत आहे. पुलावर खड्डे पडल्याने त्यातील मुरुम बाहेर येऊन दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे फरशी पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डीपी रस्त्याच्या कामामुळे वाहनांची नासाडी…
शहरात देखील पिंपळे रस्ता ते धुळे रस्ता जोडणाऱ्या डीपी रस्त्याचे काम डॉ. कदम यांच्या दवाखान्याजवळ अपूर्ण असल्याने कच्च्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणी देखील चारचाकींच्या खालच्या भागाला धक्के लागून वाहने खराब होतात तर मोटारसायकलस्वार, सायकलस्वारांना मणक्यांना त्रास होत आहे. यामुळे हाडांच्या डॉक्टरांकडे रुग्णांची संख्या वाढली आहे. या रस्त्यावर पिंपळे रस्ता ढेकू रस्ता व परिसरातील विविध कॉलनीतील शेकडो नागरिक ये जा करतात. खड्डे बुजवण्याची किरकोळ दुरुस्ती देखील होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.






