कुडाळ : स्व. भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टी ठेवून लावलेल्या अजिंक्यतारा कारखानरूपी रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षामुळे सभासद, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली गेली आहे. जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून जावलीतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती मिळवून देण्यासाठी अजिंक्यतारा कारखाना प्रतापगड कारखान्याला उभारी देईल, असे आश्वासक प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक हॉलमध्ये कारखाना अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे होते. सभेस व्हा. चेअरमन नामदेव सावंत यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जेष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, लालासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती वनिता गोरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सभेत सहकारी तत्त्वावरील प्रतापगड सहकारी साखर कारखाना मर्या, सोनगाव करंदोशी ता. जावली हा कारखाना भागीदारी तत्वावर चालविण्यास घेण्याबाबत संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीवर विचारविनिमय करून सभासदांनी या विषयाला एकमताने मंजुरी दिली आणि प्रतापगड कारखाना भागीदारी तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला. यानंतर बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जावली तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असून, या तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना पुन्हा सक्षमपणे सुरु करून देणे आवश्यक आहे. जावलीतील शेतकरी बांधवांच्या पाठीशी अजिंक्यतारा कारखाना खंबीरपणे उभा असून प्रतापगड कारखाना सुरु करून शेतकऱ्यांची चिंता दूर करण्याचे काम लवकरच केले जाईल.
[read_also content=”कोरेगाव शहराचा ठोस आणि श्वाेस्वत विकास करणार : आमदार महेश शिंदे https://www.navarashtra.com/maharashtra/koregaon-will-develop-solidly-and-independently-mla-mahesh-shinde-nrdm-324994.html”]
कार्यकारी संचालक मोहिते यांनी प्रास्ताविक केले. व्हा. चेअरमन सावंत यांनी आभार मानले. सभेला जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, सूर्यकांत धनवडे, रविंद्र कदम, धर्मराज घोरपडे, अरविंद चव्हाण, दादा शेळके, गणपत शिंदे, दिलीप फडतरे, सुनील काटे, धनाजी शेडगे, बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष जालिंदर महाडिक, संचालक अजित साळुंखे, पंडितराव सावंत, शिवाजी सावंत, गणपत मोहिते, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.






