रविंद्र माने-वसई : श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी दि. ९ सप्टेंबरला प्रतिशनिशिंगणापुर म्हणून सुप्रसिध्द असलेल्या वाघोली येथील शनिमंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे या दिवशी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. शनीदेव, हनुमान यांच्यासह संत बाळुमामा, श्री विठ्ठल रखुमाई यांचे ही दर्शन घेता येते. नालासोपारा रेल्वे स्थानकापासून ५ किमी अंतरावर असलेल्या या मंदिरात एसटी महापालिका, डमडम किंवा रिक्षाने ही जाता येते. विशाल जागेत वसलेल्या या निसर्गरम्य मंदिरात पाळणे, झोपाळे, उद्यान आणि झाडांवर उभारलेली घरे (ट्री-हाऊस), खवय्यांच्या रसनेचे चोचले पुरवणारी खाद्य जत्रा, प्रशस्त विनामुल्य पार्कींग असे सर्वकाही आहे.
खाद्य जत्रेत बटाटे वड्यापासून अगदी वेज सुपपर्यंत सर्वांचा आस्वाद घेता येतो. स्थानिक महिलांनी तयार केलेल्या आंबट-गोड आळुवड्या, साबुदाना वडे, पुरणपोळ्या या खाद्य पदार्थांचा फज्जा उडवल्यानंतर त्या कुटुंबासाठी पार्सल नेण्याचा मोह ही आवरत नाही. सायंकाळी गडद अंधारात दिपोत्सवाचा अनुभव तर अवर्णीय असतो. दिवसभर हनुमंताला अर्पण केलेले तेल साठवून या तेलातून हा दिपोत्सव केला जातो, ते ही भक्तांच्या हातून, दुपारी कढी-भात आणि गोड शि-याचा महाप्रसाद खाऊन मन तृप्त होते, ते वेगळेच. अशा या प्रतिशनिशिंगणापुराचा आनंद वर्णावा किती असे आपसूकच आहे हे इथे आलेल्या भक्तांच्या तोंडून ऐकायला मिळते.
या मंदिरात वसई तालुक्यासह मिरा-भाईंदर, ठाणे, पालघर आणि मुंबईतून पर्यटकांची गर्दी होत असते. कितीही गर्दी झाली तरी ती न जाणवू देणे हे मंदिराच्या व्यवस्थापनाचे कसब मात्र, जाणवत असते. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना, झाडे लावा आणि त्यांचे संगोपन करा असा संदेश मोफत रोप वाटपातून दिला आहे. आतापर्यंत तुळस पासून केळीच्या झाडांपर्यंत लाखो रोपे मंदिराने आलेल्या भक्तांना मोफत दिली आहेत.
हजारो भक्तांच्या उपस्थितीत शेवटच्या शनिवारी विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ६ वाजता अभिषेक, पूजेनंतर शनी होम आणि त्यानंतर दर्शनाला सुरुवात होणार आहे. यावेळी भक्तांना विविध झाडांची रोपे मोफत देण्यात येणार आहेत. दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी दीपोत्सव त्यानंतर सहा वाजता महाआरती होईल. दिवसभर खाद्य जत्रा ही सुरु राहणार आहे. या जत्रेतील खाद्याचा आस्वाद झोपळा, गार्डन, ट्री हाऊस असे कुठेही बसून घेता येणार आहे. हनुमान आणि शनीदेवाचे दर्शन झाल्यानंतर श्री संत सद्गुरू बाळू मामा आणि श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन ही घेता येते. विशेष म्हणजे यावेळी कोणतीही मदत, मार्गदर्शन हवे असेल तर मामा- ९०११६६७७८८ या क्रमांकावर त्वरीत उपलब्ध होतात. चला तर मगं, श्रावणातल्या शनिवारी करु वाघोलीची वारी.