संग्रहित फोटो
महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी नुकताच सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला हाेता. प्रस्तावित कामांच्या निविदा तातडीने सादर करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या हाेत्या. विधीमंडळाचे नागपुर अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरु हाेत आहे, ते १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आणि आचारसंहीता लागू केली जाऊ शकते. या पार्श्वभुमीवर प्रशासनाने पुर्ण झालेल्या कामांचे लाेकार्पण आणि प्रस्तावित कामांच्या निविदांना मंजुरी देण्याची भुमिका घेतली आहे. लाेकप्रतिनिधी असतानाही ज्या पद्धतीने घाई घाईने प्रस्ताव दाखल आणि मंजुर केले गेले जात हाेते. त्याच पद्धतीने प्रशासकीय कालावधीत प्रस्तावांना मंजुरी मिळत आहे.
डॉक्टरांचा पगार थेट दुप्पट
पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा मिळत नव्हती. कमी पगारामुळे येथे डॉक्टर नोकरीसाठी येत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या होत्या. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा मासिक पगार सव्वा लाख रुपये वरून थेट अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये फिजिशियन ( ५ ), भुल तज्ञ (२), स्त्रीराेग तज्ञ ( ८ ), बालराेग तज्ञ ( ९ ) यांचा समावेश आहे. या पदांसाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना अडीच लाख रुपये तर पदव्युत्तर पदविका असलेल्या उमेदवारांना दिड लाख रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. डाॅक्टर, नर्सेस यांची संख्या कमी असल्याने या रुग्णालयातील सेवेवर परीणाम हाेत आहे, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शंभर निविदांना मंजूरी
स्थायी समितीच्या बैठकीत विविध कामांच्या शंभर निविदांना मंजुरी दिली गेली आहे. यामध्ये शहरात कचरा संकलनासाठी महापालिका ३४० छोटया घंटागाडया भाडे तत्वावर घेणार आहे. छोटया घंटा गाडयांसह १२ काॅम्पॅक्टर, ११ बीन लिफ्टरचाही समावेश आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षात २८४ कोटी रूपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.






