संग्रहित फोटो
पुणे शहरात महापालिकेचे सुमारे १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेकडून सामूहिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. अपघात अथवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. मात्र नैसर्गिक मृत्यू झाल्यास मदत देण्याची कोणतीही तरतूद नसल्याने अशा प्रसंगी कुटुंबियांना मदत करणे शक्य होत नाही. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडल्यास कुटुंबियांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हा लाभ तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिला जाणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
महापालिकेत कार्डिअॅक कक्ष
महापालिकेच्या मुख्य इमारतीत दररोज सुमारे तीन हजार कर्मचारी काम करतात, तर हजारो नागरिक विविध कामांसाठी येथे येत असतात. अशा वेळी एखाद्या नागरिकास तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक ठरल्यास महापालिकेच्या मुख्य इमारतीत कार्डिअॅक रुग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र त्या रुग्णवाहिकेत प्रथमोपचारासाठी डॉक्टर नसतात. दोन दिवसांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांना हृदयरोगाचा झटका आल्यावरही तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे पथ विभागाचे शिपाई अशोक वाळके यांचा मृत्यू झाला तर, वरिष्ठ लिपिक छाया सुर्यवंशी यांच्यासह, आरोग्य निरिक्षक राहूल शेळके यांच्यावर वेगवेगळया रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीत कार्डिअॅक कक्ष उभारला जाणार असून, त्या ठिकाणी एक स्वतंत्र डॉक्टर नियुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.






