पुणे–नांदेड दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावणार (फोटो सौजन्य-X)
पुणे : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत या हायस्पीड ट्रेनसह अनेक रेल्वेगाड्या कार्यरत आहेत. या वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे देशात अनेक ठिकाणी पसरत आहे. असे असताना आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर आता जलदगती रेल्वेसेवेचा नवा टप्पा सुरू होत आहे. पुणे ते नांदेडदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची तयारी रेल्वेकडून सुरू असून, या मार्गावर प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या सेवेची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे–नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसची प्राथमिक चाचणी नोव्हेंबर अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत ही सेवा नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या सेवेची घोषणा झाल्यानंतर मराठवाडा आणि पुण्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, या एक्स्प्रेसचे संभाव्य थांबे हे नांदेड, लातुर, धाराशिव असतील. काही ठिकाणी तांत्रिक तपासणीनंतर अंतिम यादी रेल्वे विभाग जाहीर करणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. प्रत्येक कोचमध्ये एसी चेअर कार, एक्झिक्युटिव्ह क्लास, फोल्डिंग सीट्स, स्वयंचलित दरवाजे, वाय-फाय, मोबाईल चार्जिंग पॉईंट आणि आरामदायी आसनव्यवस्था असेल. संपूर्ण ट्रेन सीसीटीव्हीच्या देखरेखखाली राहणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
तिकीट दर आणि वेळ किती?
या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर अद्याप जाहीर झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार पुणे-नांदेड प्रवासासाठी चेअर कारचे भाडे सुमारे १५०० ते १८०० रूपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २२०० ते २५०० रूपये इतका असण्याची शक्यता आहे. प्रवासाचा कालावधी सुमारे ६ ते ७ तासांपर्यंत कमी होईल, जो सध्या साधारण ११ ते १२ तासांचा आहे.
प्रदेशाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा
या नव्या सेवेमुळे मराठवाडा आणि पुणे यांच्यातील व्यापार, शिक्षण आणि पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे. पुण्यात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय मिळेल.
अधिकृत घोषणा लवकरच
रेल्वे मंत्रालयाकडून या ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख आणि वेळापत्रक पुढील काही आठवड्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर अंतिम तयारी सुरू असून, या मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा ‘गुड न्यूज’ ठरणार आहे.
हेदेखील वाचा : ‘वंदे भारत’ एक्सप्रेस तब्बल पाच तास उशिरा धावली; ऐन सणासुदीत प्रवाशांना फटका






