'वंदे भारत' एक्सप्रेस तब्बल पाच तास उशिरा धावली; ऐन सणासुदीत प्रवाशांना फटकार! (फोटो सौजन्य-X)
आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून भारतीय रेल्वेला हजारो प्रवाशांकडून प्राधान्य दिलं जातं. त्यातच दिवाळीच्या काळात सोलापूरहून मुंबईकडे येणारी ‘वंदे भारत‘ एक्सप्रेस तब्बल पाच तास उशिरा धावली. यामुळे नांदेडला जाणारे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर काल तब्बल सात तास अडकून पडली होती. या विलंबामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
दुसऱ्या दिवशीही या गाडीचे वेळापत्रक कोलमडले. सकाळी ८.१५ वाजता येणारी ही गाडी दुपारी १.३० नंतर पोहोचली. वंदे भारत’ ही गाडी सोलापूरहून मुंबईला येते आणि त्यानंतर नांदेडसाठी रवाना होते. मात्र, या गाडीला रविवारी साडेसहा तास उशीर झाला होता. त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या वेळी घरी जाणाऱ्या प्रवाशांना या अनपेक्षित विलंबाचा फटका बसला. प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. ऐन सणाच्या दिवसात झालेला हा विलंब अनेकांसाठी गैरसोयीचा ठरला.
दरम्यान, नरकचतुर्दशी सोमवारी होती व मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे. यामध्ये आलेल्या रविवार साधून मोठवा संख्येने नागरिकांनी प्रवासाचा बेत आखला होता. आरामदायी आणि वेगवान रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची वंदे भारतला पसंती असते. मात्र, रविवारी सोलापूर-मुंबई-नांदेड वंदे भारतने प्रवाशांच्या विश्वासावर पाणी फेरले आहे.
विलंबाची माहिती प्रवाशांना
कुडूवाडी परिसरात वंदे भारतसमोरील फायबर मिश्रित भाग मोडकळीस आला. गाडीची तपासणी करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. यामुळे २२ मिनिटे रेल्वे एका जागी खोळंबली होती. प्रत्यक्षात सायंकाळी सात वाजता सीएसएमटीला पोहोचली, अनेक प्रवाशांना गाडीची वेळ बदलल्याची माहिती केवळ दोन तास आधी देण्यात आली.
पुणे-नागपूर वंदे भारत सुरु
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ते सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणेपर्यंतचा प्रवास अतिशय जलद गतीने करता येणार आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.