हजारो कामगारांची समस्या दूर; चाकण एमआयडीसी फेज-२ साठी पीएमपीएमएलची बससेवा सुरू
PMPML Chakan MIDC Phase 2 Bus: चाकण एमआयडीसी औद्योगिक वसाहतीच्या फेज-२ परिसरातील हजारो कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधेमुळे दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढत होता, तर अनेकांना वेळेवर कामावर व शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणेही कठीण होत होते.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)ने चाकण एमआयडीसी फेज-२ साठी नवीन सार्वजनिक बससेवा सुरू करून मोठा दिलासा दिला आहे.औद्योगिक परिसरातील कंपन्या, कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून सार्वजनिक वाहतुकीची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत पीएमपीएमएलने बसची मर्यादित उपलब्धता असतानाही चाकण परिसरासाठी विशेषतः सहा बस उपलब्ध करून दिल्या आहेत.ही बससेवा चाकण – आळंदी फाटा – एच.पी. चौक – एअर लिक्विड – जी.ई. कंपनी – शिंदे गाव – वासुली – वराळे – आंबेठाण या मार्गावर धावणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी दर अर्ध्या तासाने बस उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे.
या बससेवेमुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून वाहतूक कोंडी आणि इंधन खर्चातही काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती वाढून औद्योगिक कार्यक्षमतेलाही चालना मिळणार आहे.बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी पीएमपीएमएलचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, पिंपरी-चिंचवड डेपो व्यवस्थापक शैलेंद्र नाईक, शिंदे गावच्या सरपंच संगीता केंदळे, संचालक विनोद जैन, ओईएन कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक हरी राव, ट्रेंड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापक बसवराज पाटील, निगडीचे एडीएम मच्छिंद्र तिटकरे, स्वारगेट नियोजन विभागाचे नवनाथ बधे, तसेच देवकर, पानमंद आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना, ही बससेवा दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी औद्योगिक कंपन्या, कर्मचारी आणि नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच संगीता केंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्थानिकांच्या मते, बसथांबे निश्चित झाल्यास प्रवाशांची सुरक्षितता वाढेल, बससेवा अधिक शिस्तबद्ध होईल आणि या नवीन सेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना प्रभावीपणे मिळू शकेल.
बससेवा सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या मार्गावर अद्याप अधिकृत बसथांबे नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बस नेमकी कुठे थांबणार याची स्पष्ट व्यवस्था नसल्याने कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बससेवा सुरू केली त्याचप्रमाणे नियोजित ठिकाणी तातडीने बसथांबे उभारून त्याठिकाणी फलक, वेळापत्रक आणि प्रवासी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






