विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ! सुनेच्या तक्रारीनंतर अटकेची टांगती तलवार (Photo Credit- X)
या गंभीर गुन्ह्यानंतर विनायक राऊत यांनी कायदेशीर अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने या अर्जावर मुख्य सुनावणी होईपर्यंत राऊत यांना कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. या अर्जावर आता २३ जुलै रोजी मुख्य सुनावणी होणार आहे. परंतु, तोपर्यंत कोणतेही न्यायालयीन संरक्षण नसल्यामुळे पोलीस विनायक राऊत यांना चौकशीसाठी कधीही ताब्यात घेऊ शकतात.
गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत. मूल होण्याच्या नावाखाली आपल्यावर तांत्रिक विधी, जबरदस्तीने औषधोपचार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचारासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अघोरी कृत्ये करणाऱ्या फिरोज शेख नावाच्या भोंदूबाबाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे.
या सर्व खळबळजनक प्रकरणावर विनायक राऊत यांनी आपली बाजू मांडताना सुनेचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. राऊत म्हणाले, “माझा मुलगा गितैश आणि सून गिरीजा हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. हा सर्व प्रकार २०१८ चा असल्याचे ती सांगत आहे, मग २०२६ मध्ये तक्रार का केली जात आहे? यातच सर्व काही काळेबेरे स्पष्ट होते.”
विनायक राऊत यांनी दावा केला की, गिरीजा यांनी कायदेशीर नोटिशीमध्ये दरमहा ५ लाख रुपये खर्चाची मागणी केली होती. याशिवाय १० कोटी रुपयांची पोटगी, मानसिक त्रासापोटी २ कोटी रुपये, ५ रूमचे घर आणि ऑटोमॅटिक गाडी मागितली होती. या अवास्तव मागण्या पूर्ण न झाल्यानेच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






