Pune ZP News: पुणे जिल्हा परिषदेत आता ७ स्वीकृत सदस्यांना मिळणार मानाचे स्थान
Pune Zilla Parishad: पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यप्रणालीत महत्त्वाचा बदल होणार असून, विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांना आत्ता सभागृहात मानाचे स्थान मिळणार आहे. राज्य शासनाने स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबतची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रशासनाने हरकती व सूचना मागविण्यास सुरुवात केली आहे.
अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी दिली. विधिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याच्या तरतुदीला पूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता.
नवीन नियमावलीनुसार, आता वकील, डॉक्टर, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध क्षेत्रांतील विषयतज्ज्ञांना जिल्हा परिषदेचे कामकाज जवळून अनुभवण्याची आणि त्यात योगदान देण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या तज्ज्ञांच्या पाठीवर संबंधित राजकीय पक्षाचा वरदहस्त किंवा पाठिंबा असणे अनिवार्य राहील.
नव्या नियमानुसार, प्रत्येक जिल्हा परिषदेत किमान पाच किंवा एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांपर्यंत स्वीकृत सदस्य नियुक्त करता येतील. पुणे जिल्हा परिषदेची सद्यस्थिती पाहता, ७३ लोकनियुक्त सदस्यांच्या बळावर येथे ७ नवीन स्वीकृत सदस्यांची वर्णी लागणार आहे. परिणामी, सभागृहाची एकूण सदस्यसंख्या आता ८० वर पोहोचणार आहे. जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचे वैभवही अशा स्वीकृत सदस्यांमुळे वाढणार आहे.
तज्ज्ञांची नियुक्ती होणार असली, तरी या निमित्ताने जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान रचनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५१ सदस्य असल्याने साहजिकच स्वीकृत सदस्यांच्या कोट्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार आहे.
राजकीय सूत्रांच्या अंदाजानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल पाच जागा मिळण्याची शक्यता असून, उर्वरित दोन जागांवर भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याला संधी येऊ शकते. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून अंतिम चेंडू शासनाच्या नियमावलीवर आणि संबंधित पक्षांच्या अंतर्गत शिफारशीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता ‘तज्ज्ञ’ म्हणून कोणाची वर्णी लागते आणि कोणत्या पक्षाचे पारडे जड राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विद्यमान निवडून आलेले सदस्य: ७३
नवे स्वीकृत सदस्य:०७
एकूण सदस्यसंख्या- ८०






