सौजन्य - नवराष्ट्र टीम
मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण 25 प्रशिक्षित पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये टपाली मतपत्रिका मोजणीसाठी 5 पथके तर इव्हीएम मतमोजणीसाठी 20 पथके कार्यरत राहणार आहेत. एकूण 17 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाणार असून, प्रत्येक फेरीची माहिती ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी जाहीर केली जाणार आहे. यामुळे उमेदवार, प्रतिनिधी तसेच उपस्थितांना प्रक्रियेबाबत सातत्याने अद्ययावत माहिती मिळणार आहे.
प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केवळ अधिकृत पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण तसेच प्रवेश-निर्गमनावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले की, “मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियमानुसार पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. सर्व पथकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, मतमोजणीदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस तत्काळ प्रतिसाद देण्याची तयारी आहे.”
दरम्यान, मतमोजणीच्या फेऱ्यांचे वेळापत्रक तसेच टपाली व ईव्हीएम मतांची मोजणी स्वतंत्रपणे व नियोजित क्रमाने करण्यात येणार असल्याने निकालांची घोषणा टप्प्याटप्प्याने अपेक्षित आहे. नागरिकांनी व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
मावळ तालुक्यात मतदानाचा टक्का समाधानकारक
मावळ तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चांगली झाल्यामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा मंद होता. मात्र दुपारच्या सत्रात मतदारांचा ओघ वाढल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या युवक-युवतींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.






