सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : सकाळी दहाची वेळ, सासवडच्या संत सोपानदेव मंदिरात नेहमीप्रमाणे दर्शनासाठी भाविकांची लगभग सुरु असते. अशातच पोलिसांना सोपानदेव मंदिरात दोन अतिरेकी घुसल्याची माहिती मिळते, काही दिवसापूर्वीच भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाचे गांभीर्य लक्षात घेवून लागलीच पोलिसांकडून तातडीने हालचालीस सुरुवात. काही वेळातच पोलिसांचा मंदिराला वेढा, पाठोपाठ विशेष पोलीस पथक, बॉम्ब शोध पथक, श्वानपथक, लष्करी जवान दाखल, मंदिराचे सर्व दरवाजे बंद, कुणालाही प्रवेश नाही. लगेच कारवाईला सुरुवात, दहशदवाद विरोधी पथकातील जवानांकडून मंदिराच्या खोलीत लपलेल्या दोन अतिरेक्यांचा शोध, त्यांना ताब्यात घेवून पोलीस रवाना, मंदिराच्या बाहेर बॉम्ब शोध पथकाकडून एक बॉम्ब निकामी करण्यात आला. दोन तासांच्या थरार नाट्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सध्या संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी तोंडावर आली असून वारीतील लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर ११ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमध्ये दाखल होत असून, १३ रोजी सोपानदेव पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. वारीतील लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ऐनवेळी येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाताना कोणताही अनुचित प्रकार अथवा हानी न होता नागरिकांना सुरक्षित कसे ठेवता येईल या दृष्टीने सासवड पोलिसांकडून मॉकड्रील करण्यात आले.
पोलिसांनी घातला मंदिराला वेढा
सकाळी दहाच्या दरम्यान संत सोपानदेव मंदिरात दोन अतिरेकी लपल्याची घटना पोलिसांना मिळताच तातडीने संपूर्ण पोलीस बंदोबस्त लावून मंदिराला वेढा घालण्यात आला. अर्थात स्थानिक नागरिकांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अचानक पोलिसांची धावपळ पाहून काही काळ मंदिर परिसरात घबराट पसरली होती. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना बाहेरच रोखून धरण्यात येत होते. मुख्य प्रवेशद्वार बंद करून पाठीमागच्या दरवाजाने लष्करी जवानांनी मंदिरात प्रवेश केला. संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करून एका खोलीतून दोन व्यक्तीं ताब्यात घेतल्याचे प्रात्यक्षिक करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. डॉग स्कॉड च्या मदतीने मंदिराच्या बाहेरील परिसराची पाहणी करून एका कोपऱ्यात ठेवलेली बॉम्ब सदृश वस्तू शोधण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेवून स्फोट घडवून सुरक्षितरीत्या निकामी करून त्यावर अग्निशमन दलाच्या मदतीने पाणी मारून विझविण्यात आले. अशा पद्धतीने तब्बल दोन ते अडीच तासांच्या थरारनाट्याचा समारोप झाल्यानंतर सासवडकर नागरिक आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्ग दर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस निरीक्षक श्रीराम पालवे, अर्चना पाटील, सुनिल भिसे, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक रुपेश राऊत, सुरज नांगरे, एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, बीडीडीएसचे सपोनि सुरेश साळुंखे आणि त्यांची पथके तसेच सासवड पोलीस ठाण्याकडील २ अधिकारी १५ पोलीस अंमलदार, मुख्यालय येथील क्यू आर टी पथक सामील झाले होते.






