पुण्यात रस्ते खोदाईला परवानगी (फोटो- istockphoto)
पुणे: विविध कारणांसाठी शहरातील रस्ते खाेदाईला परवानगी दिली असुन महापालिकेने आता रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून भरीव निधी आणावा, अशी मागणी आपला परीसर या संस्थेने केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, स्मार्ट सिटीचे प्रकल्प तसेच एटीएमएस सिग्नल यंत्रणेसाठी ५०० किलोमीटरची रस्ते खोदाईची परवानगी देताना खाेदाई शुल्क माफ केले जाण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभुमीवर ही मागणी केली गेली आहे.
शहराच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांकडून तब्बल ४५० कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सुमारे १२०० सीसीटीव्ही शहरात बसविले जाणार आहेत. सीसीटीव्हीच्या नेटवर्कसाठी तब्बल ५०० किलोमीटरचे रस्ते खोदण्यात येणार आहेत.पोलीस आणि महापालिकेच्या खोदाईने पुढील वर्षभरात १ हजार किलोमीटरची रस्ते खोदाई होणार आहे. त्याबाबतचे प्रस्ताव महापालिकेकडे दाखल झाले असून, या खोदाईचे तब्बल ६०० कोटींचे शुल्क माफ करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
या खोदाईनंतरही संबधित रस्त्यांची दुरूस्ती महापालिकेनेच करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे पुन्हा या रस्ते दुरूस्तीचा २०० ते ३०० कोटींचा भार महापालिकेलाच उचलावा लागणार आहे. हे सीसीटीव्ही बसविण्याचे काम देण्यात आलेल्या कंपनीकडून हे खोदाईचे प्रस्ताव महापालिकेकडे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, पालिकेकडून जागेची पाहणीही करण्यात आले आहे.
भरीव निधी आणा; मग शुल्कात माफी द्या
गृह खात्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीचे इतिवृत्तात मुद्दा क्रमांक दोन फेज २ प्रकल्पासाठी आरओडब्ल्यू/ आरआय शुल्क माफ करण्यासाठी पत्र दिले जाणार आहे. या पत्रानुसार महापालिकेने थेट शुल्क माफीचा विचार करु नये. शहरातल्या लोकांना आर्थिक तोशिष न बसता हा प्रकल्प कशाप्रकारे पुढे नेता येईल यासंदर्भात पुणे शहरातील खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, सुनील कांबळे, चेतन तुपे, योगेश टिळेकर आदी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्याकडून राज्य सरकारकडून भरीव निधी आणावा आणि मग शुल्कामध्ये माफी द्यावी, अशी मागणी आपला परिसरचे आणि माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
पुण्याची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यांत होणार असून, यापूर्वी नऊ टप्प्यांतील कामासाठी निविदा अंतिम करून कंत्राट देण्यात आली आहेत. तर आता उर्वरित तीन टप्प्यांतील कामासाठीच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन टप्प्यासाठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरकडून तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली. त्यामुळे या दोन कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रिंगरोडच्या १२ ही टप्प्यांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता भूमिपुजन लवकरच होण्याची शक्यता आहे.