Hinjewadi To Shivajinagar Metro Trial Run Success Pune Marathi News
Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावरील मेट्रो ट्रायल यशस्वी; लवकरच सुरू होणार
शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्यापर्यंत पोहोचली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच सुरू होणार (फोटो- istockphoto)
Follow Us:
Follow Us:
पुणे: माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम ८७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्यात आहे. त्याअनुषंगाने शुकवारी (दि.४) दुपारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिली चाचणी धाव घेण्यात आली. ती यशस्वी झाली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक – खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली असून या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे.
या २३.३ कि.मी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये २३ स्थानके आणि विद्यमान मेट्रो मार्गांसह एकसंध इंटरचेंज असणार आहे. जे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी महत्वाचे ठरणार आहे. चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डब्बे असून त्याची एकूण प्रवाशी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी ८० कि.मी वेगाने धावणार आहे.
शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्यापर्यंत पोहोचली आहे. या मेट्रो लाईन ३ चे काम विक्रमी वेळेत पुर्ण होत असल्याने निश्चितच पुणे शहरासह संबंधित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
जून महिन्यात ‘पुणे मेट्रो’चा रेकॉर्ड
पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून महिन्यात एकट्या महिन्यात तब्बल ५२ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या असून, मेट्रोने एका महिन्यातच ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.
महामेट्रोच्या वतीने वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू आहे. दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील गणपती विसर्जनाच्या दिवशी एकाच दिवशी ३ लाख ४६ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता.
मेट्रोच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात मेट्रोला एकूण २ कोटी ३३ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर मे महिन्यात ही आकडेवारी होती ४७ लाख ६२ हजार प्रवासी आणि उत्पन्न २ कोटी ७२ लाख रुपये. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्न दोन्हीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Web Title: Hinjewadi to shivajinagar metro trial run success pune marathi news