खडकवासला धरण 81 टक्के भरले (फोटो- तेजस भागवत)
खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण 81 टक्के भरले आहे. कालपर्यन्त धरण 32 टक्के भरले होते. मात्र रात्रभर झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या मुठा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. 500 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
#खडकवासला धरणाच्या नवीन मुठा कालव्यातून आज ७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ५०० क्यूसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये. खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासन#Khadakwasla#Pune — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 7, 2026
खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कोणत्याही क्षणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; अनेक ठिकाणी पावसाचा हाहा:कार
पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. सध्या देशभरात पावसाचा हाहा:कार पाहिला मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. असे असताना आता पुणे जिल्ह्याच्या काही भागाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यातील म्हणजेच सह्याद्री घाट परिसरातील शाळा उद्याही बंद राहणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील इतर तालुके आणि पुणे शहरातील शाळा मात्र सुरूच राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका परिसरातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही मंगळवारी बंद राहणार आहेत. पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई-पुणे लोणावळ्याजवळील ‘मिसिंग लिंक’सह अनेक घाटांमध्ये दरडी कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मावळमधील पाटण येथे घरावर दरड कोसळून तिघाजणांच्या कुटुंबाचा अंत झाला आहे.






