Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात... (संग्रहित फोटो)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मान्सूनच्या पावसाने अद्याप अपेक्षित जोर धरला नसल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेशी पाण्याची आवक झालेली नाही. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून केवळ ३.७८ टीएमसी म्हणजेच १२.९८ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.
मागील वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १२.१९ टीएमसी म्हणजे ४१.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा तब्बल ८.४० टीएमसीची तूट निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खडकवासला धरणात सध्या ०.३९ टीएमसी म्हणजे १९.७८ टक्के पाणीसाठा असून, धरण परिसरात ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पानशेत धरणात १.८८ टीएमसी म्हणजे १७.७१ टक्के जलसाठा असून, १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
वरसगाव धरणात १.५१ टीएमसी म्हणजे ११.७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, तेथे १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. टेमघर धरण परिसरात ८ मिलिमीटर पाऊस पडला असला तरी धरणातील उपयुक्त जलसाठा अद्याप शून्य टक्के आहे.
पाऊस नसल्याने पाण्याची आवक नाहीच
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने धरणांमध्ये नव्याने येणारी पाण्याची आवक अत्यंत मंदावली आहे. गतवर्षी जूनअखेरीस मान्सूनने लावल्यामुळे दमदारसाखळीती हजरी पाणीसाठव १२ टीएमसीच्या पुढे गेला होता. मात्र, यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने आतापर्यंत केवळ ३.७८ टीएमसी साठा जमा झाला आहे.
बिल्डरांनो, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नकाच
पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करण्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हे बांधकाम थांबवण्याची नोटीस संबंधितांना देण्यात येणार आहे. पावसाने दिलेली ओढ आणि खडकवासला धरणसाखळीतील मर्यादीत पाणीसाठा या पार्श्वभूमीवर सध्या शहरात पाणी कपात सुरु आहे. या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.






