निलेश चव्हाणच्या बंदूक परवान्यावरुन पुणे पोलीस आणि गृह विभागाच्या अडचणींमध्ये वाढ झाली (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तसेच या प्रकरणामुळेराजकीय क्षेत्रातील आणि पोलीस खात्यातील अनेकांची नावे समोर आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाण हा अडचणीत आला. त्याला नेपाळच्या सीमेवरुन अटक झाली असून आता त्याच्या पिस्तूल परवानावरुन नवे धक्कादायक दावे समोर येत आहे. याबाबत पुण्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे चर्चेत आलेला निलेश चव्हाणने पुणे पोलिसांनी पिस्तूल परवाना नाकारल्यानंतर अपिलात जाऊन “पॉवर” वापरून तो परवाना गृहविभागाकडून मिळविल्याचे समोर आले आहे. यामुळे निलेश चव्हाण याला नेमकी पॉवर कोणाची मिळाली, त्याला परवाना देण्यासाठी त्याने कोणीची मदत घेतली असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर त्याला परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाणने पिस्तुल परवान्यासाठी वारजे माळवाडी पोलिसांत अर्ज केला होता. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांनी त्याचा अहवाल निगेटिव्ह पाठविला. त्यानुसार पोलिसांनी त्याचा अर्ज सुरक्षेच्या कारणास्तव फेटाळून लावला. यानंतर चव्हाणने गृह विभागात अपील केले. त्यावेळच्या गृहराज्यमंत्र्यांच्या समोर झालेल्या सुनावणी अंती त्याला परवाना देण्याचा निर्णय झाला. गृह विभागाच्या आदेशानुसार, पुणे पोलिसांनी कार्यवाही करत चव्हाणला परवाना मंजूर केला.
मात्र, हे सर्व घडत असताना निलेश चव्हाण याच्यावर वारजे माळवाडी पोलिसांतच बलात्कार व इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा नोंद झाला होता. ही माहिती गृह विभागाला देणे आवश्यक असतानाही पुणे पोलिसांनी ती कळवली नाही. किंवा पुन्हा तसा अहवाल गृहविभागाला पाठविला नाही. आणि त्याला पिस्तूल परवाना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे संबंधित गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली असती तर परवाना देण्याचा आदेश मागे घेतला गेला असता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, निलेश चव्हाण याने पॉवरचा वापरकरून पिस्तूल परवाना मिळवल्याची जोरदार चर्चा आहे. त्याने राजकीय ओळख वापरल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांनी नाकारल्यानंतरही वरच्या पातळीवरून आदेश मिळवणे तितकेसे सोपे नसते. तरीही तो निलेशने मिळविल्याने त्याला नेमकी ताकद कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे. तर, शस्त्र परवाना देण्यामागे कोणाची भूमिका होती, हे देखील उघडकीस यावे, असे बोलले जात आहे.