कुटुंब म्हणून आम्ही एकच (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
बारामती : राज्यात सहकारी साखर कारखान्यांची संख्या मोठी असल्याने विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख असताना नवीन सहकारी साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सर्व ऊसाचे गाळप वेळेत व्हावे यासाठी नव्याने खाजगी कारखान्यांना परवानगी देण्यास सुरुवात झाली. बारामती तालुक्यात एकही खाजगी साखर कारखाना नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच आमची राजकीय विचारधारा वेगळी असली तरी, कुटुंब म्हणून आम्ही एक असून, एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभाग घेत असतो, असेही त्यांनी म्हटले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बारामती शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतल्या. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘विरोधक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावसारख्या छोट्या साखर कारखान्यामध्ये लक्ष घालण्याची गरज होती का? असा सवाल करत आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील १९,७०० सभासदांच्या प्रपंचाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांना जर ही निवडणूक छोटी वाटत असेल तर त्यांनी देखील लक्ष घालण्याची गरज नाही’, असे त्यांनी सांगितले.
तसेच माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने या पाच वर्षात चांगले काम केले आहे. ऊसाला चांगला दर देण्याबरोबरच साखर उतारा वाढला आहे. कारखान्यावर ४२५ कोटींचे कर्ज असल्याचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा आहे. माळेगाव कारखान्यामध्ये सध्या ७,१९,४१८ क्विंटल साखरेचा साठा आहे. त्यामुळे सध्याच्या दराने साखर विकल्यास त्याची किंमत २६९ कोटी आहे. तर या साखरेवरील बँकेचे कर्ज २२९ कोटी आहे. कर्ज फेडून ४० कोटी कारखान्याकडे शिल्लक राहतील. पतसंस्थेकडून एक रुपया देखील कर्ज काढले नसून कारखान्याकडे ज्या ऐच्छिक ठेवी आहेत, त्याचा व्याजदर ८% आहे , त्या ऐच्छिक ठेवी कारखान्यासाठी वापरण्यात आले आहेत, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडून सभासदांची केली जातीये दिशाभूल
माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊसाला चांगला भाव देण्याबरोबरच इतर अनेक गोष्टी चांगल्या केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल केली जात आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांपुढे जाऊन दिलेल्या शब्द आपण पाळणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
कुटुंब म्हणून आम्ही एकच
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बंद दार झालेल्या चर्चेबरोबरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पवार साहेबांसह मी, दिलीप वळसे पाटील बाळासाहेब थोरात, इंद्रजीत मोहिते पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील हे नेते देखील होते. त्यामुळे बंद दाराआड कोणतीही चर्चा झालेली नाही. माझा मुलगा जय याच्या साखरपुड्यासाठी सर्व कुटुंबीय एकत्र आले होते. आमची राजकीय विचारधारा वेगळी असली तरी, कुटुंब म्हणून आम्ही एक असून, एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभाग घेत असतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.