संग्रहित फोटो
पिंपरी : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लागू असलेली आचारसंहिता शुक्रवारी (दि. ५) अधिकृतपणे संपुष्टात आली आहे. या निर्णयाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामांवरील बंदी उठली असून, सोमवारपासून (दि. ८) महापालिकेचे कामकाज पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
१८ मे रोजी लागू झालेली ही आचारसंहिता २५ जूनपर्यंत असणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने आचारसंहिता मागे घेण्याचे आदेश दिले आहेत, परिणामी पालिकेच्या धोरणात्मक निर्णयांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
विकासकामांना नवी गती
आचारसंहितेच्या काळात महापालिकेच्या विविध समित्यांच्या सभा आणि महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय प्रलंबित होते. आता ही बंधने दूर झाल्याने रखडलेली विकासकामे मार्गी लागतील. प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण असले, तरी निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी यावर आपली नाराजीही व्यक्त केली आहे.
१५ जूनची सर्वसाधारण सभा निर्णायक
आचारसंहिता उठल्यानंतर महापालिकेची पहिली मासिक सर्वसाधारण सभा १५ जून रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून, त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती : १० नवीन स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया.
विकास योजना (DP) : सुधारित प्रारूप विकास योजनेवरील सुनावणीसाठी समितीची स्थापना.
प्रशासकीय पुनर्रचना : मालमत्ता कर वसुलीसाठी शहराची विभागणी तीनवरून दोन विभागांत (अ आणि ब) करण्याबाबतचा प्रस्ताव.
भाडेतत्व : पुनावळे येथील ९१ गुंठे जागा खासगी संस्थेला ३० वर्षांच्या कराराने देण्याचा विषय.
याव्यतिरिक्त, बुधवारी (दि. १०) स्थायी समितीची महत्त्वाची बैठकही होणार आहे.
“निवडणूक आचारसंहिता संपल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आगामी १५ जूनच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज निश्चित करण्यात आले असून, आता महापालिकेचे सर्व कामकाज नियमितपणे आणि गतीने पूर्ण केले जाईल.” — उल्हास जगताप, नगरसचिव, पिंपरी-चिंचवड महापालिका.






