पुणे मेट्रो(फोटो-सोशल मिडिया)
पुणे : ‘राष्ट्रीय एकता दौड’ अर्थात रन फॉर युनिटी या उपक्रमांतर्गत ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन २ नोव्हेंबर रोजी (रविवारी) आयोजित करण्यात आली आहे. या विशेष प्रसंगी सहभागी धावपटू आणि नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने आपल्या सेवेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी पहाटे तीन वाजल्यापासूनच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. सामान्यतः मेट्रो सेवा पहाटे उशिरा सुरू होते, परंतु या वेळी महामॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर पहाटे तीन ते सकाळी सहा या वेळेत दर १५ मिनिटांच्या अंतराने गाड्या धावणार आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकची शरणागती? भारताला लवकरच मिळणार Asia cup ट्रॉफी! BCCI सचिवांनी दिली अपडेट, म्हणाले…
१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट मार्गिका
२. वनाझ ते रामवाडी मार्गिका
पहाटे सहा नंतर मात्र मेट्रो सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार म्हणजेच रात्री अकरा वाजेपर्यंत नियमित सुरू राहील. ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन स. प. महाविद्यालय, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो, आणि त्या निमित्ताने दरवर्षी ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील नागरिकांमध्ये एकतेचा आणि ऐक्याचा संदेश पोहोचविणे हा आहे. पुण्यात होणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष सेवेचा लाभ घेऊन नागरिकांना वेळेवर आणि पर्यावरणपूरक मार्गाने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यास देखील प्रोत्साहन मिळेल. या निर्णयामुळे पुणे मेट्रोकडून नागरिकांना दिलासा मिळाला असून, ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभागी होणाऱ्यांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.






