पुणे स्टेशनचंही नाव बदलणार? दोन ऐतिहासिक नावं चर्चेत, वाद निर्माण होण्याची शक्यता
विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील प्रमुख रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदलण्याची शक्यता आहे. मात्र या नावबदलावरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. सध्या दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं चर्चेत असून, त्यावरून राजकीय आणि सामाजिक मतमतांतरे उफाळून आली आहेत.
Nitin Gadkari : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीचं अडकेल वाहतूक कोंडीत; चक्क दौरा करावा लागला रद्द
खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचं नाव थोरले बाजीराव पेशवे असं ठेवावं, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडनं याला जोरदार विरोध करत, स्टेशनला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव द्यावं, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.
पुणे-सोलापूर रेल्वे विभागाची बैठक आज पार पडली असून, या बैठकीला पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीत मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या नावबदलाचा मुद्दा मांडला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं की, कोणत्याही महत्त्वाच्या स्थानकाचं नाव त्या भागाच्या इतिहासाशी जोडलेलं असावं, जेणेकरून त्या परिसराचा गौरवशाली वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल. पुणे हे केवळ आयटी हब आणि शैक्षणिक शहरच नाही, तर त्याचा ऐतिहासिक वारसाही मोठा आहे. बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अटकपासून कटकपर्यंत नेला. शनिवार वाडा याच वारशाचं प्रतीक आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला त्यांचं नाव दिल्यास इतिहासाचं जिवंत दर्शन घडेल, असं त्या म्हणाल्या.
दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडने बाजीराव पेशव्यांच्या नावाला विरोध करत, पुणे स्टेशनला महात्मा फुले यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्यामागे महात्मा फुलेंचं मोठं योगदान आहे. त्यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि समाजसुधारणेसाठी जे कार्य केलं, त्यामुळेच पुण्याला आजचा लौकिक मिळाला आहे. त्यामुळे “आधुनिक पेशवाई नको”, असं स्पष्ट करत त्यांनी महात्मा फुले यांचं नाव देण्याचा आग्रह धरला आहे.
या दोन्ही मागण्यांमुळे पुणे रेल्वे स्टेशनच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.