सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळेगाव : माळेगाव शहरात वाढत्या तापमानाचा पहिला बळी ठरलेल्या ढगाईनगर येथील राहणारा सचिन लक्ष्मण रासकर (वय ४५) यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ३० एप्रिल रोजी उष्माघातामुळे त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेने माळेगाव शहर हादरले असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
रासकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी घडलेला प्रसंग उपस्थितांना हेलावून गेला. त्यांचा लहान मुलगा आयुष, वडिलांच्या अस्थीविसर्जनावेळी “पप्पा, मी पास झालो… मला चांगले मार्क्स मिळाले, पण माझं कौतुक कोण करणार?” असे म्हणत रडू लागला. या हृदयद्रावक आक्रोशाने स्मशानभूमीत उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले.
आयुषच्या शाळेचा निकाल त्याच दिवशी लागला होता. वडिलांच्या निधनामुळे तो निकाल घ्यायलाही जाऊ शकला नव्हता. नंतर शिक्षकांनी त्याला तो उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. ही आनंदाची बातमी वडिलांना सांगता आली नाही, याची खंत त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती. माळेगाव शहरातील ढगाईनगर परिसरात राहणारे रासकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे सुद्धा वाचा : कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्…
पुण्यातील जुन्नरमध्येही उष्माघातानं महिलेचा मृत्यू
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उष्माघातामुळं काही ठिकाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उष्माघाताचा बळी गेला आहे. शेतात काम करताना कष्टकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उष्णतेचा वाढता तडाखा आता जीवघेणा ठरत असल्याचं समोर आलं आहे. निमगाव सावा येथे शेतात काम करत असताना एका कष्टकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावमाळा परिसरातील रुपाली गाडगे या सकाळच्या सुमारास शेतात खुरपणीचे काम करत होत्या. याचवेळी अचानक त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हे पाहता उष्माघाताने त्यांचा जीव गेल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत कष्टाची कामे टाळावीत, पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






