संग्रहित फोटो
पुणे : स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर येथील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन महामंडळ तसेच पुणे पोलिसांनी ऑडिट अन् बैठका घेऊन नियोजन केले आहे. त्यानूसार, २४ तास सुरक्षा ठेवण्यास सुरूवात देखील केली. मात्र, तरीही बसस्थानकाचा आणि स्वारगेटचा परिसर चोरट्यांचाच असल्याचे दिसत असून, अत्याचाराच्या घटनेनंतर सलग तिसऱ्यांदा प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांची ही चोख बंदोबस्ताची सुरक्षा भेदून चोरटे फिरत असल्याचे यावरून दिसत आहे. एकूणच प्रकारानंतर स्वारगेटचा परिसर हा चोरट्यांचाच असल्याचे दिसत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात रविवारी घडलेल्या घटनेत रितेश गजानन बकरे (वय २०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यावरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रितेश रविवारी साताऱ्याला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आले होते. ते साताऱ्याकडे निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारात ते फलाटावर एसटी बसची वाट पाहत थांबले होते. त्यांनी त्यांची पिशवी ठेवलेली होती. तेथे लॅपटॉपची पिशवी देखील होती. त्याचवेळी त्यांची नजर चुकवून चोरट्यांनी त्यांची लॅपटॉप असलेली पिशवी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार करत आहेत.
गेल्या आठवड्यात महाडला निघालेल्या प्रवाशाकडील लॅपटॉप चोरुन नेल्याची घटना घडली होती. त्यापुर्वी अत्याचार घडलेल्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कंडक्टर महिलेची रोकड चोरून नेण्यात आली होती. घडलेल्या या घटनांमुळे मात्र, बस स्थानक म्हणजे चोरट्यांचाच अड्डा असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन महामंडळाचे सुरक्षा रक्षक आणि पुणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तरीही चोरटे त्यांच्या नजरेतून सुटत चोऱ्या करत आहेत.
एसटी प्रवासात महिलेकडील ३ लाखांची रोकड चोरली
गेल्या काही दिवसाखाली अहिल्यानगर ते वाकडेवाडी एसटी बस प्रवासात महिलेकडील ३ लाखांची रोकड अज्ञाताने चोरून नेली आहे. त्यांच्या पर्समधून ही रोकड चोरण्यात आली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ४३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. तक्रारदार या अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथील आहेत. त्या काही कामानिमित्त पुण्याकडे येत होत्या. सकाळी साडे नऊच्या सुमारास त्या अहिल्यानगर येथून पुणे वाकडेवाडी बसस्थानक या बसमध्ये बसल्या होत्या. दुपारी साडे बाराच्या सुमारास त्या वाकडेवाडी बसस्थानकात उतरल्या. दरम्यान, त्यांच्याकडील पर्समध्ये त्यांनी ३ लाखांची रोकड ठेवली होती. अज्ञाताने त्यांच्या पर्समधून ही रोकड चोरली. बसमधून उतरल्यानंतर त्यांना पैसे चोरीला गेल्याची लक्षात आले. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.