पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या; शहराच्या बहुतेक भागात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र, जो काही शहरात पाऊस झाला. त्यानंतर शहराच्या बहुतेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणाऱ्या कच्च्या पाण्याच्या गढूळतेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची गढूळता प्रकल्पाच्या निर्धारित शुद्धीकरण क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ती पूर्णपणे नियंत्रित करणे सध्या शक्य होत नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. यामुळे शहरातील बहुतेक भागाला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्यातील धरणसाठ्यात तब्बल 14 टक्क्यांची तूट; 43.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा
जलशुद्धीकरण केंद्रातून वितरित करण्यात येणारे पाणी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून पूर्णपणे निर्जंतुकीकरण करूनच नागरिकांना पुरवण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये कोणतेही रोगजनक जिवाणू राहणार नाहीत, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता पाणीपुरवठा विभागामार्फत घेतली जात आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पाण्याची गढूळता वाढली
सध्या पाण्याची गढूळता वाढलेली असल्याने नागरिकांनी अतिरिक्त खबरदारी म्हणून पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवून त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुरटी फिरवून गढूळ कण तळाशी बसू द्यावेत. त्यानंतर वरचे स्वच्छ पाणी स्वच्छ कापडाने किंवा योग्य फिल्टरद्वारे गाळून उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
तुरटीचा वापर करून गढूळता कमी करावी
तसेच, सिंहगड रस्त्याकडील हद्दवाढीतील गावांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर केवळ निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्या भागात जलशुद्धीकरण (फिल्टर) प्रकल्प उपलब्ध नसल्यामुळे संबंधित नागरिकांनी पिण्याचे पाणी आवश्यकतेनुसार तुरटीचा वापर करून गढूळता कमी करावी, त्यानंतर ते गाळून व उकळूनच वापरावे, असेही आवाहन केले आहे.






