राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी इच्छुकांमध्ये चुरस
दोन दिवसांत ११६ उमेदवारी अर्जांची विक्री
दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल नाही
वडगाव मावळ / सतिश गाडे: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळचे दहा गण अशा एकूण पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. १६) पासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली.
दोन दिवसांत ११६ अर्जांची विक्री
उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झाले नसले तरी अर्ज विक्रीला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ७४ तर दुसऱ्या दिवशी ४१ असे एकूण ११६ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. मावळ तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणांसाठी उमेदवारी अर्जांची विक्री तसेच भरलेले अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था वडगाव येथील तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात यासाठी विशेष मंडप उभारण्यात आला असून, दाखल होणाऱ्या अर्जांची छाननी करण्याचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी इच्छुकांची जोरदार फिल्डिंग
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, काही गट व गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक पातळीवर भेटीगाठी, कार्यकर्त्यांच्या बैठका, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क तसेच विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमांमधून आपली उपस्थिती ठळक करण्यावर इच्छुकांचा भर दिसून येत आहे.
विशेषतः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही महत्त्वाच्या गट–गणांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच पक्षसंघटन मजबूत असल्याचे दाखवण्यासाठी इच्छुकांकडून ताकद प्रदर्शन सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंतिम उमेदवारी जाहीर होताच अनेक ठिकाणी राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, उमेदवार निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






