Purandar Airport News: पुरंदर विमानतळाचा 'टेक-ऑफ' सुसाट! ६३७ कोटींच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी
Purandar Airport News: प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीपूर्वीच या परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने ‘पंख’ फुटले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) विमानतळ जोडणीसाठी तब्बल ६३६ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, ६१ किलोमीटर लांबीच्या भव्य रस्ते प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या प्रकल्पामुळे केवळ अंतरच कमी होणार नाही, तर पुरंदर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट होणार आहे.
विमानतळ झाल्यास तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा अडधळा येऊ नये, या दूरदृष्टीने पीएमआरडीएने हे नियोजन केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सध्या भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, यासाठी स्वतंत्र तरतूद नसली तरी प्राधिकरणाने आपल्या अंतर्गत निधीतून या कामाचा मार्ग मोकळा केला आहे. या रस्तेजाळ्यामुळे पुरंदर आणि लगतच्या परिसरातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे.
Purandar Airport Land Acquisition: ४५० एकर जमिनीचा संमती करार पूर्ण
पुणे जिल्ह्याच्या महत्त्वाकांक्षी पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच न देता, तो ‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या’ (पीडीसीसी) खात्यातही जमा करण्याची परवानगी द्यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या – प्रमाणावर जिल्हा बँकेशी जोडलेले आहेत. जिल्हा बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात बँकेच्या आर्थिक सक्षमतेचा आढावा सादर केला आहे. पीडीसीसी बैंक ही देशातील अग्रगण्य जिल्हा बँक असून तिच्या एकूण २९४ शाखांचे जाळे पसरलेले आहे.
विमानतळाला जोडणारे एकूण चार मुख्य मार्ग विकसित केले जाणार आहेतः
पुणे-बोपदेव-सासवड मार्गः पुणे शहरातून थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी १९.५ कि.मी.चा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
उरुळी कांचन-वाघापूर मार्गः सोलापूर महामार्गावरून येणारी वाहतूक या १५ कि.मी.च्या मार्गामुळे सुलभ होईल.
खेड शिवापूर-गराडे-सासवडः सातारा महामार्गावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी १६ कि.मी.चा हा मार्ग ‘लाईफलाईन’ ठरणार आहे.
सासवड-पानगाव-चौफुलाः जिल्हांतर्गत दळणवळणासाठी १०.५ कि.मी.चा रस्ता विकसित केला जाईल.






