शेतकऱ्यांच्या मुद्यावरून रघुनाथदादा पाटील आक्रमक
सांगली: महायुती सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, असे आश्वासन देऊन केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली, शेतकऱ्यांचे कर्ज हे सरकारचे पाप आहे, त्यामुळे आता निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, ‘मार्च एन्ड’ च्या निमित्ताने शेतकऱ्यांवर सक्तीच्या कारवाई केली जात आहे, ती तात्काळ थांबवावी, अन्यथा पूर्वीप्रमाणे संस्था पेटवू, बँकांना टाळे ठोकू असा इशारा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, शेतकरी संघटनेच्या वतीने १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून १९ मार्च २०२५ महाराष्ट्रातील सरकारच्या धोरणाचे पहिले बळी ठरलेले साहेबराव करपे यांचे स्मृती दिवस पर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती जनजागरण अभियानाचा महाराष्ट्रभर प्रचार झाला. याची समारोप सभा एकदिवसीय धरणे आंदोलन करून पुणे येथील कृषी आयुक्त, सहकार आयुक्त यांचे दारात सेंट्रल बिल्डिंग पुणे या ठिकाणील नेतृत्वाखाली झाली.
१९ मार्चच्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची उपस्थिती मुळे महाराष्ट्र सरकारने विधान सभेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासंदर्भात अजित पवार यांनी २२ मार्च रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून कर्जमुक्ती करण्याची पावले उचलली आहेत. हे शेतकरी संघटनेने केलेल्या एक दिवसीय आंदोलनाचे फलित आहे, एकीकडे समिती स्थापन केलेली असताना शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी जप्तीच्या कारवाई केली जात आहे, ती तात्काळ थांबवा, अन्यथा शेतकरी संघटना पूर्वीप्रमाणे आम्ही संस्था पेटवून देऊ, बँकांना टाळे ठोकू ” असा इशारा त्यांनी दिला.
लिंकग मध्ये सरकार भागीदार
युरिया घेण्यासाठी नको ती खते शेतकऱ्यांच्या माथी मारून लिंकिंग केले जाते, यामध्ये सरकारच सहभागी झाले आहे, याला आमचा विरोध आहे. जे.पी.नड्डा एकीकडे सांगतात, लिंकिंग करू नका, आणि दुसरीकडे कंपनी हेच करत आहेत, त्यामुळं सरकारच यामध्ये भागीदार असल्याची शक्यता आहे. कॉम्पिटेशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेकडे फर्टिलायझर कंपनीच्या तक्रारी आम्ही केल्या आहेत, तरीही नको असलेली मिश्रखते व इतर खते माथी मारली जात आहेत. युरियावर सबसिडी मात्र सोबत दिली जाणारी खते महागडी, त्यामुळे सबसिडी कंपन्यांना मिळते.
कर्जमाफी इशाऱ्यासाठी २ एप्रिलला मोर्चा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, सक्तीच्या वसुली, बँक खाती सील, जप्ती, पोलीस बळ आणि जमीनदारांना त्रास देणे सुरू आहे, ते थांबवा, शेतमाल निर्यातबंदी उठवा, साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, मागणीसाठी पहिल्या टप्प्यात २ एप्रिलला शेतकरी संघटनेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला जाणार आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन रघुनाथदादा यांनी केले.
या प्रमुख आहेत मागण्या
* संपूर्ण कर्जमाफी करा.
* कारखान्यांची अंतर अट रद्द करा.
* सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा.