रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विकासकामांना निधीअभावी मोठी खीळ बसली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मार्फत हाती घेतलेली अनेक विकासकामे रखडली आहेत. या ठप्प कामांबाबत माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि स्थानिक आमदार दळवी साहेब यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यात MMRDA च्या माध्यमातून तब्बल ५६५ विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ३५० कामांचे कार्यआदेश (वर्कऑर्डर) दोन वर्षांपूर्वीच जारी करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात केवळ ७० ते ७५ कामांनाच निधी वितरित झाला असून उर्वरित कामे कागदावरच अडकून पडली आहेत.
निधीअभावी अनेक ठेकेदारांनी प्रत्यक्ष कामे सुरू करण्यास नकार दिल्यामुळे, गावागावांतील रस्ते व सार्वजनिक सुविधा प्रकल्प रखडले आहेत. परिणामी, अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे.
माजी आमदार पंडित पाटील यांनी या संदर्भात MMRDA चे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर देवरे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
रायगड हा पर्यटन आणि औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा असूनही शासनाकडून निधी न मिळाल्याने विकास थांबलेला आहे. यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला फटका बसत आहे.
“रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर निधी तात्काळ वितरित झाला पाहिजे. शासनाने लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा जनतेचा संयम सुटेल,” असा इशारा माजी आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. MMRDA मार्फत मंजूर झालेल्या शेकडो विकासकामांना निधीअभावी खीळ बसली आहे. पंडित पाटील यांनी शासनावर टीका करत ही परिस्थिती तातडीने सुधारावी, ठेकेदारांच्या निष्क्रियतेवर कारवाई करावी, आणि रायगडच्या विकासाला नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी केली आहे.






