पेण तालुक्यात 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने पेण तालुक्यात विविध शासकीय उपक्रम, शिबिरे आणि मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस तहसीलदार तानाजी शेजाळ, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, अनिल बावीस्कर आदी अधिकारी उपस्थित होते.
Ganeshotsav 2025 : गणेश मंडळांना मोठा दिलासा! गणेशोत्सवातील मंडपाच्या खड्ड्यावरील वाढीव दंड रद्द
प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, महसूल सप्ताहाचे उद्दिष्ट नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेत वाढ करणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवणे हे आहे. यासाठी खालीलप्रमाणे उपक्रम राबवले जाणार आहेत:
महसूल सप्ताहाच्या विशेष उपक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या समन्वयाने विशेष शिबिरे आयोजित करण्यात येतील. नागरी सेवा केंद्रांमार्फत ऑनलाईन सेवा देण्यात येईल.
वारस नोंदणी, ७/१२ उतारे, म्युटेशन नोंदी, जात प्रमाणपत्रे, निवासी दाखले इत्यादी तत्काळ वितरित करण्यात येतील.
प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी नागरिकांना महसूल सप्ताहातील उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, स्थानिक ग्रामपंचायती, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी यासाठी जनजागृती करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.