विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानासाठी पुढाकार; कर्जतच्या भालिवडीत साकारली आधुनिक ‘पिंक रूम’
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळेत पिंक रूम बनवण्यात आले आहे. या पिंक रूमचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विकास वाघमारे यांचे हस्ते झाले.यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती नारायण डामसे,आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम आणि आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव ललित कुमार वराडे तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे,प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे आदी उपस्थित होते. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे मार्गदर्शना खाली आदिवासी विकास विभागाच्य शासकीय आश्रमशाळेत असा उपक्रम पहिल्यांदा राबवण्यात आला आहे.
पिंक रूम” ची संकल्पना साकारली असून भालिवडी शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या अत्यंत संवेदनशील काळात हक्काचा आराम, स्वच्छता, आणि मानसिक बळ मिळावे या उद्देशाने वसतिगृहातील एका स्वतंत्र खोली निर्माण करण्यात आली.ही पिंक रूम अत्यंत सुसज्ज आणि सुंदर स्वरूप देण्यात आले आहे. या पिंक रूम सुरक्षित वाटावी अशी रचना करण्यात आली असून मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तेथे आरामदायी बेड, गरम पाण्याची पिशवी (हिटिंग जेल बॅग), आणि पिण्याच्या गरम पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासोबतच प्रथमोपचार आणि औषध पेटी, आणि वजन काटाही ठेवण्यात आला आहे.केवळ भौतिक सुविधांवर न थांबता, मुलींमध्ये आरोग्यविषयक साक्षरता निर्माण करण्यासाठी या खोलीत ‘मासिक पाळीत काय करावे आणि काय करू नये’ याचे माहितीफलक लावण्यात आले आहेत.
तसेच ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ (गुड टच-बॅड टच) याविषयी जनजागृती करणारे फलक, या काळात करायचे योग्य व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेणारे मार्गदर्शनही अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी येथे इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांसारख्या महान व प्रेरणादायी स्त्रियांची पुस्तके असलेले छोटे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध, सोशल मीडियाची सुरक्षितता आणि सर्व महत्त्वाचे आपत्कालीन हेल्पलाइन नंबर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन ही खोली मुलींसाठी खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित कवच’ बनली आहे. या कार्यक्रमात भालिवडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या डिजिटल पॅनल वर्गांचे तसेच टॅब रूमचे उद्घाटन सुद्धा आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे यांचे हस्ते करण्यात आले.
रानावनांतून आलेल्या या आदिवासी कन्या आपल्या डोळ्यांत स्वप्नांचे मोती घेऊन जेव्हा शाळेच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम या ‘पिंक रूम’च्या माध्यमातून पेण प्रकल्पाने केले आहे. हा उपक्रम आगामी काळात संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरेल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी दिली.
KARJAT: कर्जतमधील 99 एकर सरकारी जमीन टोरंट कंपनीला; शिवसेनेचा तीव्र विरोध






